देवगिरी दौलताबाद किल्ला history Daulatabad Fort Information in Marathi
शालिवाहन, शिलाहार, चालुक्य, कदंब यांच्या राजवटीचा काळ म्हणजे महाराष्ट्राचा सुखाचा काळ. त्यानंतरही देवगिरीचा यादवकाळ भरभराटीचा होता. प्रजा आनंदात होती. महाराष्ट्राच्या लोकमाता म्हणजेच भीमा, कृष्णा, गोदावरी, इंद्रायणी यांनी महाराष्ट्राची भूमी सुजलाम् सुफलाम् केली होती. सह्यगिरीदेखील मोठ्या दिमाखाने महाराष्ट्राचे रक्षण करीत होता. शेते पिकत होती. दूध-दुभते मुबलक होते. धन-धान्याच्या राशींनी कोठारे भरलेली होती. सण-उत्सवांना ऊत यायचा. सर्वजण एकत्र जमून जल्लोष करायची.
सरस्वती विलसत होती. नाशिक, नेवासे नगरीत विद्येचा सुकाळ होता. भागवत धर्माची पताका फडकत होती, अलंकापुरीला वैभव प्राप्त झाले होते. टाळ-मृदुंगांच्या घोषणांनी पंढरी दुमदुमत होती. नामदेवांनी ज्ञानाची पताका थेट पंजाबपर्यंत फडकवली होती. संतवाणीने अज्ञानरूपी अंधकार दूर होत होता. एकंदरीत, महाराष्ट्राची भूमी पावन झाली होती, यादवकाळात महाराष्ट्राचे वैभव शिखरावर पोहोचले होते. राजा रामदेवरायाचा
काळ खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ होता. साहित्य, कला, वैद्यकशास्त्र यांतील प्रगती
वाखाणण्यासारखी होती. परंतु हे फार काळ टिकले नाही.
उत्तरेकडील शत्रू महाराष्ट्राच्या भूमीवर येऊन धडकला. शत्रूने देवगिरीवर आक्रमण केले. अफगाणी सैन्याने आपल्या अमंगल पावलांनी महाराष्ट्राची मंगल, पावन भूमी भ्रष्ट केली. विंध्याचल बुडवीत आणि नर्मदा नदी पार करीत महाराष्ट्राच्या भूमीवर चालून आलेला दुष्मन होता, दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी!
देवगिरीचा राजा शूर होता. शत्रूला भिऊन पळून जाणारा भेकड नव्हता. निधड्या
छातीच्या या राजाने शत्रूला चारी मुंड्या चीत केले असते. पण... नेमक्या त्याच वेळी राजा रामदेवरायाचा पुत्र शंकरदेव मोठे सैन्य घेऊन घरभेदी शत्रूला पाणी पाजण्यासाठी 'देवगिरीपासून खूप दूर गेला होता. राजा रामदेवरायाजवळ मोजकेच सैन्य होते. शत्रूने याच गोष्टीचा फायदा घेतला. अल्लाउद्दीन खिलजी प्रचंड फौजेनिशी देवगिरीवर धडकला. तरीही राजा डगमगला नाही. चालून आलेल्या शत्रूला तो भिडला. शत्रूला धूळ चारण्याचा निकराचा प्रयत्न त्याने केला; पण शत्रूच्या प्रचंड फौजेसमोर त्याचा टिकाव लागला नाही. मर्द मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली; पण अखेर त्यांना शत्रूपुढे शरणागती पत्करावी लागली.
तोपर्यंत ही बातमी शंकरदेवाला समजली होती. तो त्वरित आपली मोठी फौज घेऊन पित्याच्या मदतीला धावला. पुन्हा दोन्ही सैन्यांत घनघोर युद्धाला तोंड फुटले, मराठी फौज त्वेषाने लडू लागली आणि युद्धाचे पारडे फिरले. आता आपला पराजय होणार, असे खिलजीला कळून आले. मग त्याने दिल्लीहून मोठी कुमक आल्याची खोटी आवई उठविली. ह्या बातमीने रामदेवरायाच्या फौजेचे धैर्य खचले. त्याचे सैनिक माघार घेऊ लागले. विजय समोर दिसत असूनही या खोट्या आवईला फसून रामदेवरायाला युद्धात हार पत्करावी लागली.
अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवरायाकडून जबर खंडणी वसूल केली. सोने, चांदी, रत्ने यांची लूट करण्यात आली. राजा रामदेवरायाचा खजिना पार रिता झाला, तरीही खिलजीची हाव कमी झाली नाही. त्याने आपल्या सैन्याला देवगिरी लुटण्याचा हुकूम दिला.
मग काय विचारता ! खिलजीच्या सैनिकांनी नगरात धुमाकूळ घातला. स्त्रियांच्या
अंगावरील दागिने ओरबाडून काढले. धनिकांच्या हवेल्या फोडून, तोडून अमाप संपत्तीची
लूट केली. प्रजेच्या घरा-दारांना आगी लावल्या. जो कोणी प्रतिकार करील, त्यांची मुंडकी
छाटली. स्त्रिया, मुले यांच्यावरील अत्याचाराला सीमाच राहिली नाही. लुटून, जाळून
वैभवशाली देवगिरी नगरी उजाड केली.
आपल्या प्रजेची व नगरीची दुरवस्था पाहून राजा रामदेवराय फार दुःखी झाला. तो हतबल झाला. देवगिरीत भयाण शांतता पसरली. प्रत्येकजणच लुटला गेला होता. कोण कोणाचे अश्रू पुसणार ?
मोठी लूट घेऊन अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीकडे निघाला. मात्र निघताना त्याने राजा रामदेवरायाकडून वार्षिक खंडणी देण्याचे कबूल करवून घेतले. रामदेवरायाचा पराभव करून मोठी लूट आणणाऱ्या अल्लाउद्दीन खिलजीचे दिल्लीत मोठे स्वागत झाले. त्याचा रुबाब आणि दरारा खूपच वाढला. त्याची आसुरी महत्त्वाकांक्षा जागृत झाली. आपणच दिल्लीचा सुलतान व्हावे, या कपटी हेतूने त्याने आधीच्या दिल्लीच्या सुलतानाची हत्त्या केली.
अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीचा सुलतान बनला. तो आणखी क्रूर बनला. त्याने राजा रामदेवरायाकडून जबर खंडणी वसूल करायला सुरुवात केली. दोन-तीन वेळा खंडणी दिल्यानंतर मात्र राजा रामदेवरायाला खंडणी देणे शक्य होईना, म्हणून त्याने खंडणी पाठविणे बंद केले. त्यामुळे खिलजी भयंकर संतापला. त्याने आपला सेनापती मलिक काफूरला तीस हजार सैन्य देऊन पुन्हा देवगिरीवर चालून जाण्यास फर्मावले. मलिक काफूरची फौज देवगिरीवर येऊन धडकली. पुन्हा रामदेवराय व शंकरदेव या पिता-पुत्रांनी या सुलतानी संकटाशी मुकाबला करण्याचे ठरविले. पुन्हा रणसंग्राम सुरू झाला, परंतु दिल्लीच्या राक्षसी ताकदीपुढे देवगिरीचा निभाव लागला नाही. अखेर
देवगिरीला हार पत्करावी लागली. राजा रामदेवरायाला कैद करण्यात आले. देवगिरी पुन्हा
संकटात सापडली. लूटमार, जाळपोळ, कापाकापी यांना ऊत आला. अल्लाउद्दीन
खिलजीच्या सैनिकांनी नगरात हैदोस घातला. रडून-रडून स्त्रिया मुलांचे अश्रू सुकून गेले.
देवगिरीचे जणू स्मशान झाले, राजा रामदेवरायाचा अपमान करण्यात आला. एवढेच नव्हे तर त्याला अंधारकोठडीत टाकण्यात आले. मग नित्यनेमाने खंडणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर काही काळाने रामदेवरायाची सुटका झाली. परंतु झालेल्या अपमानाने रामदेवराय मनाने पार खचून गेला. त्यामुळे काही दिवसांतच तो हे जग सोडून गेला.
रामदेवरायाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र शंकरदेवाचा राग अनावर झाला. त्याच्या मनात सुलतानाविषयीचा अंगार पेटला. त्याने दिल्लीच्या सुलतानाला खंडणी न पाठविण्याची प्रतिज्ञाच केली. हे पाहून खिलजी पुन्हा सूडाने पेटला. त्याने परत एकदा मलिक काफूरला मोठ्या फौजेनिशी देवगिरीवर धाडून दिले. शंकरदेवाने सुलतानाच्या फौजेशी निकराने झुंज दिली. शत्रूला सहजासहजी विजय मिळवू दिला नाही. परंतु दुर्दैवाने, लढता लढताच शंकरदेव धारातीर्थी पडला. पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. देवगिरीवर दुर्दैवाची जणू कुन्हऱ्हाड कोसळली. घरे दारे भस्मसात झाली. होत्याचे नव्हते झाले. देवगिरी पार उद्ध्वस्त झाली. देवगिरीला आता कोणी बालीच उरला नाही. देवगिरीची सत्ता सुलतानशाहीने गिळंकृत केली.
सुलतानशाहीने देवगिरी राज्याचे तुकडे पाडले. राज्यकारभारासाठी सुभेदारांच्या नेमणुका करण्यात आल्या. हे सुभेदार स्वतःलाच सुलतान समजू लागले. त्यांनीही प्रजेवर अत्याचार, जुलूम, जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. प्रजेच्या छळाला, हाल-अपेष्टांना पारावार राहिला नाही. या अत्याचाराने प्रजा गांजून गेली. प्रजेची ही अवस्था पाहून रामदेवरायाचा जावई हरपालदेव पुढे सरसावला. त्याने प्रजेला धीर दिला, प्रजेला हाताशी धरून त्याने शत्रूवर दहशत बसविली. प्रजेला काही काळ तरी दिलासा मिळाला. प्रजा थोडी-फार भयमुक्त झाली. त्याने या जुलमी, बेबंद सुभेदारांविरुद्ध बंड उभारले. काही आक्रमकांना त्याने यमसदनास पाठविले. हे पाहून काही सुभेदार दिल्लीला पळून गेले.
तिकडे दिल्लीला सुलतान अल्लाउद्दीन खिलजी मरण पावला. दिल्लीच्या सिंहासनासाठी तेथे भांडणे सुरू झाली. या भांडणात मलिक काफूर मारला गेला. कुतुबुद्दीन दिल्लीचा सुलतान बनला. तोही भयंकर क्रूर स्वभावाचा होता. जरा जम बसताच तो मोठ्या सैन्यानिशी देवगिरीवर चालून आला.
हरपालदेवाने देवगिरी वाचविण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, परंतु शत्रूच्या अफाट ताकदीपुढे त्याला मान तुकवावी लागली. शत्रूने त्याला पकडून ठार केले. देवगिरी लुटली गेली. देवगिरीची राखरांगोळी झाली. पुन्हा
देवगिरीवरील संकट टळत नव्हते. देवगिरीची व्यवस्था पाहण्यासाठी पुन्हा जुलुमी सरदारांची नेमणूक करून शत्रू दिल्लीला परतला.
मागचे दिवस पुन्हा पुढे आले. सरदारांचे शिपाई नेहमीच लूटमार करायचे, बाया बापड्यांचा छळ करायचे, विरोध करणाऱ्याला कापून काढायचे. प्रजेच्या हाल-अपेष्टांना अंत नव्हता. त्यातच दुष्काळ पडला, की लोकांची अन्नान्न दशा व्हायची. गुरेढोरे चाऱ्या पाण्याविना मरून पडायची. राजाने छळले आणि दुष्काळाने पिडले, तर तक्रार तरी कोणाकडे करायची? प्रजेची अवस्था 'मुकी बिचारी कुणीही हाका' अशी दयनीय झाली होती.
एकीकडे अशी स्थिती, तर दुसरीकडे सुलतानाने नेमलेले सरदार आणि त्यांचे शिपाई जिवाची चैन करण्यात धुंद झालेले. त्यांचा स्वैराचार शिगेला पोहोचला. प्रजेला छळण्यात त्यांना आसुरी आनंद बाटू लागला. उन्मत्तपणे वर्तन करून त्यांनी प्रजेला दुःख-सागरात लोटले. त्या सरदारांनी आता तर दिल्लीच्या सुलतानाची सत्ता झुगारून दिली व ते स्वतःच सुलतान बनले.
अहमदनगरचा निजामशहा, विजापुरचा आदिलशहा, बिदरचा बेरीदशहा, गोवळकोंडपाचा कुतुबशहा आणि एलिचपुरचा इमादशहा या सरदारांनी आपापली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. अशा प्रकारे या प्रदेशात पाच सुलतानी सत्ता उदयास येऊन त्यांनी हिंदू प्रजेला गुलामगिरीत ढकलले आणि हिंदू प्रजेवर सत्ता गाजविण्यास सुरुवात केली. याच वेळी दिल्लीचे सिंहासन बाबराने बळकावले. दिल्लीत मोगल सत्तेचा उदय
झाला. हिंदुस्तानचा बराचसा प्रदेश परकी आक्रमकांनी बळकावल्यामुळे महाराष्ट्राच्या
सुखाला जणू ग्रहण लागले.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा